३९ वे अखिल भारतीय गुलाब अधिवेशन व गुलाब प्रदर्शन 39th All India Rose Convention & Rose Show ...

 ३९ वे अखिल भारतीय गुलाब अधिवेशन व गुलाब प्रदर्शन

दि रोझ सोसायटी ऑफ पुणे , पुणे महानगरपालिका , जयवंतराव टिळक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुलाब प्रदर्शन/स्पर्धा तसेच ३९ वी  अखिल भारतीय गुलाब परिषद ह्या कार्यक्रमाचे आयोजन श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे दिनांक २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते.  दि रोझ सोसायटी ऑफ पुणे ह्या संस्थेचे हे हीरक महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने पुष्परचना स्पर्धा /प्रदर्शन यांचे औचित्य साधण्यात आले.  
हे ठिकाण म्हणजे पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, जेणेकरून पुण्याबाहेरील असो कि महाराष्ट्राबाहेरील, प्रत्येकाला येथे येण्यासाठी अगदी सोयीचे ठिकाण निवडण्यात आलेले.
मला ह्या कार्यक्रमास नाशिक रोझ सोसायटीच्या सह-सचिव ह्या नात्याने उपस्थित राहण्याचा योग आला. श्री छत्रपती संभाजीराजे उद्यान फुलांनी सजविण्यात आलेले होते, जागोजागी रांगोळी टाकण्यात आलेली . प्रवेशद्वारातून आत येताच तेथे रांगोळीच्या माध्यमातून चित्रित केले भव्य गुलाब नजरेस पडले. त्यावरून ह्या कार्यक्रमाची व्यवस्थापकीय भव्यता लक्ष्यात आली.  
ह्या स्पर्धेत भाग घेणारे गुलाब प्रेमी देशातील विविध राज्यांतून आली होती. बंगाल, दिल्ली , पंजाब , भोपाळ , हैदराबाद , झारखंड अशा व अनेक ठिकाणांहून  येतांना गुलाबाचे कटिंग आणणे , प्रवासात ते खराब होऊ नये याची काळजी घेणे, पुन्हा त्या गुलाबांची व्यवस्थित मांडणी करीत ते लोकांसाठी दोन- तीन दिवस देखनीय असावेत हे सर्व करणे म्हणजे एक कलाकारीच, हे फक्त अन फक्त गुलाब वेडी माणसंच करू शकतात. ह्या प्रदर्शनात भाग घेणाऱ्या सर्वांचा माझा आदरपूर्वक सलाम .

कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे जेष्ठ शास्रज्ञ श्री रघुनाथजी माशेलकर ह्याच्या हस्ते झाले व त्यांनी आगामी काळात भारतीय गुलाबांची अधिकाधिक निर्यात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली .  कार्यक्रमास टिळक विद्यापिठाचे कुलपती श्री दीपकजी टिळक, पुणे महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त श्री विकासजी ढाकणे, सी.टी.आर. इंडस्ट्रीजचे प्रमुख श्री अनिल कुमार, श्री.रोहित टिळक तसेच दि रोझ सोसायटी ऑफ पुणेचे विद्यमान अध्यक्ष श्री गणेशजी शिर्के व इतर सभासदांपैकी श्री अरुणजी पाटील, श्री रवींद्रजी भिडे, श्री. भगवंतजी ठिपसे तसेच पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक श्री अशोकजी घोरपडे हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमास गुलाब प्रेमी डॉ. श्री विकासजी  म्हसकर, डॉ. सौ मेघना म्हसकर मॅडम , श्री विजय कांत सर , श्री भगवंतजी ठिपसे सर,  ऍड. राहुल कुमार सर , मे. जगताप होर्टीकल्चर फार्मचे श्री रामरावजी जगताप ,सौ गिरीजा व श्री .वीरू राघवन (सर व मॅडम), श्री. सुरेश पिंगळे सर, अर्शद भिवंडीवाला सर , श्री संग्राम जगताप, नवल बायोटेकचे श्री.पाटील सर, श्री चिपळूणकर सर (कोल्हापूर), सौ बर्वे मॅडम , सौ.ऋचा कुलकर्णी मॅडम ,श्री. तुषारजी  तेलंग असे अनेक गुलाब क्षेत्रात काम करणारे दिग्गज गुलाबप्रेमी ह्या गुलाब प्रदर्शनासाठी येथे उपस्थित होते.


येथे पुष्परचना, तसेच विविध गुलाबांच्या जातींचे (व्हरायटीजचे ) प्रदर्शन मांडण्यात आले. ह्यात किमान अडीचशेहुन अधिक रंगीबिरंगी व विविध जातींच्या गुलाबांचे प्रत्यक्ष बघण्याचा लाभ लोकांना मिळाला. म्हणजे विचारांत नसलेले किव्वा एखाद्या कवी कल्पनेतील चित्रकाराने स्वच्छंद रेखाटलेले गुलाब असावे असे अविश्वनीय असे पण प्रत्यक्ष समोर गुलाब बघायला मिळाल्यावर गुलाब क्षेत्रात काम करणाऱ्याना गुलाबप्रेमी म्हणावे कि गुलाबवेडी (माणसं). प्रत्येक गुलाब म्हणजे एखादी कलाकृती वाटावी असेच होते. आणि हे गुलाब खरे तर आपल्याला सहसा सामान्य नर्सरीत कधी दिसतच नाहीत. जवळपास सर्वांसाठी गुलाब घेणे म्हणजे "अहो काका दोन लाल गुलाब द्या, दोन पिवळे,एक पांढरा" आणि एखादा दिसलाच तर वेगळा. परंतु येथे आल्यावर कळते कि गुलाब माव , डिलाइट,चेरी पारफेट, रेनबोव क्नॉक-आऊट, मार्डी ग्रास ,पॅट ऑस्टिन, सेंट पॅट्रिक, फ्रँकली स्कार्लेट, जुलिया चाईल्ड आणि अजून कित्तेक विविध प्रकारांचेही गुलाब असतात. अन मग त्या गुलाबांची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.




 Click to watch Video : 39th All India Rose Convention & Rose Show/ The Rose Society of Pune

                               

                               

बरं प्रदर्शन म्हणा किव्वा पुष्परचना स्पर्धा येथेच संपत नाही. कारण ह्या प्रदर्शनाचा उद्देश फक्त लोकांना गुलाब दाखवावेत असे नाही तर लोकांनीही ह्या गुलाबांची लागवड करावी व आपले गुलाब प्रेम जोपासावे. म्हणून दि रोझ सोसायटी ऑफ  पुणे यांनी प्रदर्शनास भेट देणाऱ्या गुलाब प्रेमींसाठी गुलाब ह्या विषयावर लेक्चर्स/ व्याख्याने  ठेवली होती. ज्यात गुलाब व त्याची जागतिक व्याप्ती , त्यांच्या बाग व त्यांचा सखोल अभ्यास ह्या सर्वांचा सार लोकांसाठी मांडला. ह्यात श्री सुशील प्रकाश , संजॉय मुखर्जी , रणजित चॅटर्जी अश्या गुलाब अभ्यासकांचे वेगवेगख्या गुलाबविषयी मुद्द्यांवर व्याख्याने झालीत .

सोबत ज्यांना कुणाला गुलाब हवे असतील अश्यांसाठी तेथे गुलाब नर्सरी वाल्यांचे स्टॉल्स देखील मांडले होते. जेणेकरून लोकांनी फक्त गुलाबांचे नेत्रसुख न घेता प्रत्यक्ष गुलाब घरी नेऊन त्याची जोपासना करावी ह्याचीही पूर्ण व्यवस्था केली होती. शेवटच्या दिवशी श्री जयवंतराव टिळक ह्यांनी निर्माण केलेल्या गुलाब बागेला म्हणजेच  ' जयवंत टिळक गुलाब उद्यानास ' भेट देण्यात आली. श्री जयवंतराव टिळक म्हणजे श्री लोकमान्य टिळकांचे नातू , आणि त्यांनीच खरे गुलाब प्रेम जोपासण्यासाठी दि रोझ सोसायटी ऑफ  पुणे ची १९६२ मध्ये  स्थापना केली. आणि त्यांचा हा वारसा टिळक घराणे व सोसायटीचे सर्व सभासद अगदी पूर्ण निष्ठेने यशस्वीरीत्या पुढे नेत आहेत ...

         

                                                                             
शेवटच्या दिवशी गुलाबप्रेमींना आकर्षण म्हणून जयवंतराव टिळक गुलाब उद्यानास भेट देण्यात आली. तेथे असलेल्या विविध गुलाब जातींची प्रत्यक्ष बघण्याची संधी सर्वांना मिळाली. तसेच गुलाब क्षेत्रात काम करणाऱ्या जगताप हॉर्टीकल्चर फार्म , प्राणबीर नर्सरी येथे भेटी देण्यात आल्या. 

फोटो सौजन्य : श्री भगवंत ठिपसे सर

ह्या कार्यक्रमात टिळक विद्यापीठाचे कुलपती श्री दीपकजी टिळक यांना प्रमुख पाहुणे श्री रघुनाथजी माशेलकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन रोझ फेडेरेशन तर्फे सौ.अनुपमा बर्वे व श्री अरुण वाराणशींवार यांना सुवर्ण पदकाने गौरविण्यात  आले. तसेच पुणे रोझ सोसायटी व गुलाबप्रेमी श्री विजय पोकर्णा यांकडून देण्यात येणारे सुवर्णपदक हे शंभराहून अधिक गुलाबांच्या जाती तयार करणारे श्री सुब्रतो बोस यांना देण्यात आले . ह्याच कार्यक्रमात श्री रामराव जगताप यांच्या "गुलाब गप्पा-टप्पा" ह्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. 

एक महत्वाची बाब म्हणजे अखिल भारतीय रोझ फेडेरेशनच्या नियमन मंडळावर नाशिक रोझ सोसायटीचे अध्यक्ष डॉ श्री धंनजयजी  गुजराथी हे सर्वाधिक मताने विजयी झाले. इंडियन रोझ फेडेरेशन ही शिखर संस्था असून, ह्या संस्थेवर निवडून जाणारे डॉ गुजराथी हे पहिले नाशिककर आहेत. ह्या कार्यक्रमास नाशिक रोझ सोसायटी तर्फे अध्यक्ष डॉ गुजराथी यांच्यासह सचिव सौ अमिता पटवर्धन व सह-सचिव प्रफुल्ल बोरसे उपस्थित होते. इंडियन रोझ फेडेरेशनच्या वार्षिक अहवालात नाशिक रोझ सोसायटीची यशोगाथा नमूद आहे. नाशिक रोझ सोसायटीने केलेल्या कामाची दखल इंडियन रोझ फेडेरेशनने घेणे हेच नाशिक रोझ सोसायटीच्या सर्व सभासदांच्या एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. 


दि रोझ सोसायटी ऑफ पुणे व इंडियन रोझ फेडेरेशन यांचे आभार मानीत पुण्यातील अतिशय शिस्तबद्ध व सुरेखरीतीने पार पडलेल्या गुलाब पुष्परचना व प्रदर्शन सोहळ्याचे कौतुक करीत आपण दिलेल्या निमंत्रणाबद्दल व आपण केलेल्या गौरवाबद्दल नाशिक रोझ सोसायटी आपले आभार मानते. आपले कार्यक्रमाचे नियोजन आम्हाला भविष्यात मार्गदर्शक ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

​​( माहितीसाठी : सदर लेखात तसेच  संबंधित यु ट्यूब व्हिडिओमध्ये वापरलेल्या इमेजेस व विडिओ ह्या काही मी स्वतःहाच्या मोबाइलमध्ये शूट केलेल्या आहेत तसेच इतरांकडून त्यांच्या परवानगीने वापरल्या आहेत. फोटोजसाठी सहकार्य : श्री भगवंतजी ठिपसे सर , श्री रवींद्र भिडे सर, डॉ.श्री विकास म्हसकर सर , सौ अमिताताई पटवर्धन) 

 अधिक बागकाम व्हिडिओज व माहितीसाठी पुढील यू ट्यूब चॅनेल बघा (For more Gardening Videos & Information ) : BEO,aSchool of Gardening


प्रफुल्ल बोरसे ( हॉर्टीकल्चरिस्ट )

सह-सचिव, नाशिक रोझ सोसायटी , नाशिक

         www.BeoGardens.com

         Email : beofarms@gmail.com 


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या